जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२३ । बंगळुरू येथून तब्बल साडेपाच किलो सोने तसेच ६ लाखांची रक्कम असा २ कोटी ७८ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या एकास गोरखपूर एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आली. गुरुवारी रात्री ११ वाजता रावेर रेल्वे स्थानकावर ही धडक कारवाई करण्यात आली.
उपेंद्र प्रदीप शाही (३५, रा. पंनथुर, मेन रोड, शोभा ड्रीम इकर, बंगळुरू, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रसह गुजरात, तेलंगणा, कर्नाटकासह विविध प्रांतांमध्ये तब्बल दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या ताब्यातून १४ हजारांची रोख रक्कम आणि ३ हजार ९०० नेपाळी चलनाच्या नोटा जप्त करण्यात आल्या.
आरोपी हा गोरखपूर एक्स्प्रेसने (गाडी क्र. ११०७९) पळून जात असल्याची माहिती भुसावळ मंडल सुरक्षा आयुक्त श्रीनिवास यांना मिळाली. आरपीएफ पीआय आर. के. मीना, उपनिरीक्षक के. आर. तर्ड, एन. के. सिंह, सुभाष राजपूत, महेंद्र कुशवाह, आर. के. एस. वसावे, विनोदकुमार वर्मा यांनी गाडीत आरोपीचा शोध घेतला. ही गाडी गुरुवारी रात्री ११ वाजता रावेर रेल्वे स्थानकावर आली असता एस- १ कोचमधून या आरोपीला अटक करण्यात आली.