⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नोकरीच्या बहाण्याने तरुणाला २ लाखात गंडविले

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । म्हसावद येथील एका बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवत बनावट वेबसाईटद्वारे दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसावद येथील अमोल रामचंद्र चव्हाण (वय-२९) तरुण परिवारासह इंदिरानगर भागात राहतो. तरुणाने मार्च महिन्यात गुगल जब या पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केली. नोंदणीनंतर दि.२५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता 241603775981, 09831942111 या क्रमांकावरून फोन आले. अरोरा व रेश्मा नामक व्यक्तीने त्याला फोन केला. तरुणाला नोकरीसाठी एचडीएफसी बँकेत एक जॉईंट आणि एक सिंगल खाते उघडण्यास सांगितले. खाते उघडल्यावर त्यात २ लाख रुपये भरण्यास सांगितले. 

नोकरीची पुढे प्रोसेस करण्यासाठी बँक स्टेटमेंट पाठविण्यास सांगून नोकरी फिक्स करण्यासाठी एटीएम कार्ड पोस्टाने पाठवायला लावले. तरुणाने रायल इनफिल्ड, बाय सिटी कॉलेज जवळ, लखनऊ या पत्त्यावर एटीएम कार्ड पाठविले. दि.८ जून रोजी जॉईंन खात्यातून सिंगल खात्यात १ लाख ९९ हजार ७८६ रुपये वर्ग करण्यात आले. त्यानंतर एकाच दिवसात खात्यातून २ लाख रुपये काढून घेण्यात आले. तरुणाने दोन्ही क्रमांकावर संपर्क केला असता ते बंद आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.