घरफोडी करणाऱ्या तिघांसह दागिने घेणाऱ्याला पकडले
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२४ । जळगाव शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या तीन जणांसह चोरीचे दागिने घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
घरफोडी चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिले होते. त्यांनी पोउनि राहुल तायडे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, पोहेकॉ कमलाकर बागूल, संदीप पाटील, प्रवीण मांडाळे, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले. माहितीच्या आधारावर पथकाने विशाल मुरलीधर दाभाडे, शुभम उर्फ मोनू प्रभाकर चव्हाण (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यात विशाल संतोष भोई (रा. तांबापुरा) याच्यासह शनिपेठ पोलिस ठाणे, जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. यात घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने हे सराफ बाजारातील नेताजी पंढरीनाथ जगताप याला दिल्याचे सांगितले. त्यावरून जगताप याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आले. त्यांना शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.