⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

कापसाला ७ हजार वर्षांचा इतिहास; सिकंदरने नेला इजिप्त, ग्रीसमध्ये कापूस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : १० फेब्रुवारी २०२३ : भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. महाराष्ट्रात कापसाची सर्वाधिक लागवड जळगाव जिल्ह्यातच होते, हे आपणासर्वांना माहित आहे. ब्रिटनला मोठ्या प्रमाणात कापसाचा पुरवठा करता यावा यासाठी इंग्रजांनी जळगाव जिल्ह्यासह देशात अनेक भागात कापसाची लागवड व उत्पादन वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले, याचीही आपणासर्वांना माहिती आहे. मात्र कापसाचा इतिहास आपणास माहिती आहे का? ऋग्वेद आणि मनूस्मृतीमध्येही कापसाचा उल्लेख आहे. कापसाच्या इतिहासाविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

इतिहासाची पाने उलगडून पाहिल्यास आपणास दिसते की, कापूस व कापसाच्या सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग याविषयीचे ज्ञान भारतीयांना फार पूर्वीपासून होते. ऋग्वेदातही कापसाचा उल्लेख आहे. मनूनेही धर्मशास्त्रात सुती वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे. ज्ञात असे सर्वांत जुने कातलेले सूत मोहों जोदडो येथील उत्खननात सापडलेले आहे. यावरून इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वी भारतात कापूस लागवडीत होता असे दिसते. कापसाचा इतिहास देखील मानवी संस्कृती एवढाच जुना आहे. साधारण: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जात असल्याचे अनेक पुरावे आहेत.

अलेक्झांडर अर्थात सिकंदरने (इ. स. पू. ३२७) भारतीय कापूस व त्यापासून तयार होणार्‍या कापडांचे वर्णन केल्याचे आढळते. ‘विशिष्ट रानटी झाडे फळाऐवजी लोकर देतात आणि ह्या लोकरीचे सौंदर्य व प्रत मेंढ्यांपासून मिळणार्‍या लोकरीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. भारतीय लोक त्यापासून तयार केलेले कपडे घालतात’, असा उल्लेख अलेक्झांडर यांनी केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी भारतातून परतताना कापूस इजिप्त, ग्रीस व इतर भूमध्य समुद्रालगतच्या देशांमध्ये नेला. यामुळे भारतातूनच कापसाचा व कापड विणण्याच्या कलेचा भूमध्य समुद्रालगतच्या देशांत आणि यूरोप खंडात प्रसार झाल्याचे स्पष्ट होते.

मेक्सिकोत कापसाच्या बोंडाचे अस्तित्व जरी इ. स. पू. ५००० वर्षे इतके प्राचीन असल्याचे एका संशोधनावरून स्पष्ट झाले आहे. भारतातून कापसाचा प्रसार केवळ पश्चिमेकडेच नव्हे तर पूर्वेकडेही झाला. इ. स. सातव्या शतकात कापूस भारतातून चीनमध्ये गेला. सुरुवातीला शोभेची झाडे म्हणून चिनी लोक कापसाची झाडे आपल्या बागेत लावत असत. नवव्या शतकानंतर तेथे कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन त्यापासून सूत व कापड निर्माण होऊ लागले. मात्र कापसाचा प्रचार व प्रसार ब्रिटिशांच्या वसाहतकाळात मोठ्या प्रमाणात जगभरात झाला.