⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

‘धर्मनिरपेक्ष’ आणीबाणीच्या काळात आलेला शब्द – सुजात आंबेडकर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२३ । स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना प्रशिक्षित न करता समाजवाद थोपवला गेला. आणीबाणीच्या काळात धर्मनिरपेक्ष हा शब्द तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी आणला. त्याविरुद्धचा राग म्हणून उजव्या विचारसरणीकडे लोक झुकले, असे मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे अध्यक्षस्थानी होते

सुजात आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, की सत्ताधाऱ्यांची नियत साफ नसेल, तर ते लोकांना न्याय देऊ शकणार नाहीत, असे डॉ. बाबासाहेबांनी १९४९ च्या भाषणात सांगितले होते. शासनकर्ते कोणतेही असो त्यांनी लोकांचे प्रश्न, त्याची चर्चा केली नाही. आपल्या संकल्पना रूजविण्यात शासकर्त्यांना अपयश आले. आताही सामाजिकपेक्षाही आर्थिक आरक्षणावर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू आहे.

वंचित समाजाचे संरक्षण काढले जात आहे. बेरोजगारी वाढत आहे. सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याबद्दल मोठ्या प्रमाणात आपण सगळे बोलत असलो, तरी आर्थिक स्वातंत्र्याबद्दलही त्याच गांभीर्याने बोलले गेले पाहिजे. अध्यक्षीय भाषणात प्रा. एस. टी. इंगळे यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. म. सु. पगारे यांनी प्रास्ताविक केले.

प्रा. अनिल डोंगरे आणि डॉ. विजय घेारपडे लिखित ‘स्त्री उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथाचे विमोचन झाले. भालचंद्र सामुद्रे यांनी प्रबोधनपर गीत सादर केले. महोत्सवाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या प्रभारीप्रमुख डॉ. पवित्रा पाटील यांनी आभार मानले.