जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । राष्ट्रीय महामार्गावर मित्रांसोबत दुचाकीची शर्यंत लावणे वर्गमित्र असलेल्या दोन तरुण अभियंत्यांच्या आयुष्याला पूर्णविराम देणारे ठरले. कारण, इतरांपेक्षा वेगाने पुढे निघण्याच्या बेतात त्यांची १०० किमी वेगातील दुचाकी पुढील डंपरला धडकली. त्यात दोघे रस्त्यावरच गतप्राण झाले. अरफाज मो.इम्तियाज कासीम (वय २२) आणि विष्णू गोविंद कारमुंगे (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. ऐन लक्ष्मीपूजनाला सोमवारी रात्री ११.३० वाजता ही दुर्घटना घडली.
शहरातील खडका राेडवरील आझाद मार्केट, ३ नंबर उर्दू शाळेजवळील रहिवासी अरफाज माे. इम्तियाज कासीम (वय २२) व गरूड प्लाॅट भागातील त्याचा मित्र विष्णू गाेविंद कारमुंगे (वय २२) यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण रेल्वे स्कूलमध्ये घेतले. शहरातील एसएसजीबी अभियांत्रिकी काॅलेजमधून बीईची पदवी घेतली. यानंतर पुणे येथे नोकरीला असलेला अरफाज दिवाळीच्या सुटीत शनिवारी (दि.२२) भुसावळात आला. त्याला सोमवारी रात्री ८.३० वाजता विष्णूचा कॉल आला. यानंतर अरफाजने आई व लहान भाऊ फरहान याला विष्णूसोबत बाहेर जात असल्याचे सांगितले. तिकडे विष्णूला देखील त्याच्या आईने दिवाळी असल्याने बाहेर न जाण्याची सूचना केली.
तरीही दोघे घराबाहेर पडले. यानंतर अपघात झाला. ही माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. विष्णूवर रात्री, तर मंगळवारी दुपारी अरफाजवर अंत्यसंस्कार झाले. दोघांची अपघातग्रस्त दुचाकी तिसऱ्याच मित्राची आहे. घटनेप्रकरणी बाजारपेठ पाेलिस ठाण्यात माेहंमद सलीम महेमूद कासीम यांच्या माहितीवरून गुन्हा दाखल झाला.
दोघे जागीच गतप्राण
रात्री ११.३० वाजता अरफाजचे काका माे. सलीम महेमूद कासीम यांना अपघाताची माहिती मिळताच ते व अरफाजचे पत्रकार असलेले वडील माे. इम्तियाज (छाेटू) हे घटनास्थळी आले. यावेळी दोघे मित्र रक्ताच्या थाराेळ्यात पडले होते. त्यांना रिक्षातून डाॅ. राजेश मानवतकर यांच्या हाॅस्पिटलला नेण्यात आले. पण, उपयोग झाला नाही.
विष्णू कुटुंबातील एकुलता एक
मूळ बिदर (कर्नाटक) येथील रहिवासी असलेले विष्णूचे वडील रेल्वेचे कर्मचारी आहेत. ते गेल्या २० ते २२ वर्षांपासून गरूड प्लाॅट भागात वास्तव्यास आहेत. त्यांना विष्णू आणि एक मुलगी असे अपत्य आहेत. मुलगी बारावीनंतरचे शिक्षण घेत आहे. तर बीईनंतर विष्णू पुण्यात नाेकरीसाठी प्रयत्न करत होता.