जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । तांदलवाडी शिवारातील ५० वर्षे जुन्या निंबाच्या झाडाला रविवारी सायंकाळी माथेफिरूने आग लावली. रस्त्याने फिरायला जाणाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मात्र मोठा अनर्थ टळला. दरम्यान, वृक्षप्रेमींकडून कारवाईची मागणी होत आहे.

तांदलवाडी-मांगलवाडी रस्त्यावर वैभव महाजन व विश्वनाथ पाटील यांच्या शेतांच्या बांधावर हे निंबाचे झाड आहे. रविवारी सायंकाळी या झाडाला आग लावल्याचे दिसले. या झाडाच्या शेजारून विद्युत तारा गेल्या आहेत. हा प्रकार लक्षात येताच रस्त्यावरून फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवल्याने तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला तसेच झाडाजवळून गेलेली तार उतरवण्यास मदत केली. शेतकरी किशोर चौधरी यांनीही संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान पाण्याच्या टँकर उपलब्ध केल्याने आग विझवण्यास मदत झाली. एकीकडे वृक्षलागवड, त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी सरकार, निसर्गप्रेमी व संस्था प्रयत्नशील आहेत. मात्र दुसरीकडे काहीजण केवळ सरपण किंवा काेळशासाठी जिवंत झाडांच्या खाेडाला खालच्या बाजूला आग लावतात. त्यामुळे ते झाड वाळून तुटून पडले की लाकूड पळवले जाते. या प्रकारामुळे तांदलवाडी- मांगलवाडी शिवारातील वीजपुरवठा रात्री ९ वाजेपर्यंत खंडित होता. त्यामुळे अशा पद्धतीने झाडे तोडणाऱ्यांवर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.