जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२४ । देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत असून अनेक शहरांमधील तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असून अशातच मात्र देशात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचेल, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे.
बंगालच्या उपसागरातील हे पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ असून हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्याच्या पद्धतीनुसार त्याचे नाव रेमल ठेवण्यात येणार आहे. मात्र, दरम्यान, हवामान खात्याने मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. मुंबईला वादळाचा इशारा देण्यात आलेला नाही, असे विभागाचे म्हणणे आहे.
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, रेमाल चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असून त्याचा वेग ताशी 102 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळेच IMD ने याबाबत अलर्ट जारी केला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. IMD च्या मते, बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेले रेमल चक्रीवादळ लवकरच पश्चिम बंगालला धडकू शकते.
आयएमडीच्या शास्त्रज्ञ मोनिका शर्मा यांनी सांगितले की, हे चक्रीवादळ शनिवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतरित होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रुपात पोहोचेल. याच दरम्यान पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये २६-२७ मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना २७ मेपर्यंत किनारपट्टीवर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.