एकनाथ खडसेंनी दिला राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा

एप्रिल 26, 2024 10:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । एकीकडे देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असून याच दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झालेला नाही. मात्र काल गुरुवारी त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला. परंतु आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही.

khadse jpg webp

गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी स्वतः खडसेंनीही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते; पण त्याला पंधरवडा उलटूनही अद्याप त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झालेला नाही. त्यावरून कुजबुज सुरु असतानाच, काल गुरुवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला.

खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश झाला नसला तरी. रक्षा खडसे आपल्या स्नुषा आहेत, तसेच मी भाजपामध्ये जाणार आहेच, त्यामुळे आपण त्यांचे काम करणार आहोत. त्यांच्या मताधिक्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे एकनाथ खडसेंनी सांगितले. अद्याप भाजपामध्ये प्रवेश झाला नसल्याने आपण महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठीच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो नाही, असेही ते म्हणाले

शरद पवार सांगतील तेव्हा आमदारकीचा राजीनामा…
पक्षाच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिला आहे; परंतु आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही. शरद पवार यांनी आपल्याकडे आमदारकीचा राजीनामा मागितलेला नाही. त्यामुळे शरद पवार सांगतील तेव्हाच, आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now