भयंकर ! दुचाकी घसरल्याने माय-लेकाला मागून येणाऱ्या टँकरने चिरडले
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच पारोळा तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्राचा लग्नसमारंभ आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीला जाण्यासाठी निघालेल्या डॉक्टर परिवाराचा अपघात झाला. खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने डॉक्टरसह त्यांची पत्नी व मुलगा खाली पडले. त्यात डॉक्टरांच्या पत्नी व मुलास मागून येणाऱ्या टँकरने चिरडल्याने दोघा मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर डॉक्टर हे जखमी झाले आहेत.
ही भयंकर घटना पारोळ्यातील सारवे-बाभळे नाग फाट्यादरम्यान घडली. नंदुरबार जिल्ह्यातील कुकावल (ता. शहादा) येथील गुरांचे डॉक्टर प्रतीक सुनील पाटील (३०) हे पत्नी पूनम प्रतीक पाटील (२४) व अगस्त प्रतीक पाटील (१ वर्षे) यांच्यासह पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे आपल्या मित्राच्या लग्न समारंभासाठी आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर ते दुचाकीने (एमएच ३९ एएच ०७०४) एरंडोल येथे मामाच्या घरी निघाले होते.
मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील सारवे, बाभळे नाग फाट्यादरम्यान अपघात झाला. उन्हामुळे डांबर निघून खडी वर आली होती. त्या ठिकाणी दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या टँकरचे (एमएच ४० सीटी ४०९७) चाक पूनम व अगस्त यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. प्रतीक हे विरुद्ध दिशेला पडल्याने ते बचावले.