धक्कादायक! जळगावात वाळू माफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

फेब्रुवारी 7, 2024 8:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 7 फेब्रुवारी 2024 : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर महसूल यंत्रणा कारवाई करत असली तरी वाळू माफियांचे धाडस कमी होताना दिसत नाही. त्यातच कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले केले जात आहे. अशातच आता वाळू माफियांनी जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांच्या पथकावर सात ते आठ वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला.

catskpjl 2024021172153 jpg webp

ही घटना तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवार, ६ रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. या घटनेत लोखंडी रॉडने वार केल्याने उपजिल्हाधिकारी कासार यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शिवाय त्यांच्या शासकीय वाहनाचीही तोडफोड झाली आहे. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने (क्र. एम एच २८, सी ६४२१) गेले होते. त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले.

यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जण त्यांच्या दिशेने आले व थेट त्यांनी कासार यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जखमी कासार यांना या ठिकाणी रात्रीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now