पाच लाखांची लाच घेताना दोन अधिकारी जाळ्यात ; जळगाव जिल्ह्यात खळबळ

नोव्हेंबर 14, 2023 10:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक तरी लाचखोरीचा प्रकार उघडकीस येत आहे. यात आता आणखी एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. पाच लाखांची लाच घेताना सहायक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला आज एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४, सहायक गटविकास अधिकारी) व पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३, विस्तार अधिकारी) असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

नेमका प्रकार काय?
जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनुसार आज पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे ( वय ५३) या पंचायत समितीतील दोन्ही अधिकार्‍यांनी तक्रारदाराला बोलावले होते. येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले. यामुळे सुटीच्या दिवशी लाच घेणे या दोघांना महाग पडल्याचे दिसून आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now