दोन हजाराची लाच भोवली : जळगाव जिल्हा कारागृह येथे दोन महिला पोलिसांसह एकाला अटक, कारवाईने खळबळ

नोव्हेंबर 8, 2023 9:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज : 8 नोव्हेंबर 2023 : लचखोरीची एक मोठी बातमी जळगावमधून समोर आली आहे. जिल्हा कारागृह, जळगांव येथे वारंवार लाच मागणाऱ्या दोन महिला पोलिसांसह एका पोलिसाला २ हजार रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. भिमा उखडु भिल, सुभेदार तसेच पुजा सोपान सोनवणे व हेमलता गयबु पाटील, महिला कारागृह पोलीस असे कारवाई करून गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांचे नाव आहे.

jalgaon trap jpg webp

नेमका काय आहे प्रकार?
५८ वर्षीय तक्रारदार या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या पहुर येथील अंगणवाडीत अंगणवाडी शिक्षिका म्हणुन कार्यरत आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध जिल्हापेठ पो.स्टे. जळगांव येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयांत त्यास अटक करण्यात येवून तो सध्या जिल्हा कारागृह, जळगांव येथे न्यायालयीन कोठडीत आहे. तक्रारदार त्याचे मुलास वेळोवेळी भेटण्याकरीता, जिल्हा कारागृह, जळगाव येथे गेले जात होते.

मात्र, तेव्हा तेथे ड्युटीवर असलेले सुभेदार भिमा भिल, कारागृह पोलीस पुजा सोनवणे, हेमलता पाटील, अनंत केंद्रेकर व परशुराम काळे तसेच वेळोवेळी ड्युटीवरील इतर कर्मचारी हे त्याचेकडून त्यांच्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रत्येक वेळी २,०००/- रु मागणी करीत असत. तक्रारदार यांची त्यांना पैसे देण्याइतकी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने तक्रारदार यांनी दि ०७ नोव्हेंबर रोजी त्याचेविरुध्द कारवाई होणेकरीता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांचेकडे लेखी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कारागृह, जळगांव येथे जावून पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान महिला कारागृह पोलीस पुजा सोनवणे व हेमलता पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या मुलाची कारागृहात भेट करुन देण्यासाठी २,०००/- रु लाचेची मागणी केली.

भिमा उखडु भिल, सुभेदार यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांच्याकडे देण्यास सांगून महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे विरुध्द जिल्हा पेठ पो.स्टे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now