डॉक्टरकीसाठी सोडले अधिकारी पदावर पाणी; पुन्हा जिद्द्दीने झाले एअरफोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’
जळगाव लाईव्ह न्यूज। २० जुलै २०२३। सैन्यदलात मराठी माणसांचा समावेश बहुतांश नगण्यच असतो. ‘एअरफोर्स’ साठी करण्यात येणाऱ्या भरतीत मराठी माणसाच्या यशाचे प्रमाण थोडकेच आहे. या सर्व गोष्टींना साफ खोट ठरवतं अमळनेर येथील तरुणाने एअरफोर्स कॉमन न ॲडमिशन टेस्टमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. ‘फ्लाइंग ऑफिसर’ या पदासाठी त्यांची निवड झालेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तांबेपुरा भागातील रहिवासी डॉ. घनश्याम नागराज पाटील यांचे सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सैन्यदलात निवड होण्यासाठी दरवर्षी भारतीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) ‘सीडीएस’,‘एनडीए’ या परीक्षा घेतल्या जातात. त्यात एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्टच्या माध्यमातून उच्च अधिकारी निवडले जातात.
देशभरातील सात लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यात ‘एसएसबी’साठी ५० हजार उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यातून ३०० उमेदवारांची निवड होऊन वैद्यकीय चाचण्याही घेण्यात आल्या.
डॉ. घनश्याम यांनी पहिल्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. दुसऱ्या गुणवत्ता यादीतही स्थान प्राप्त करत आपले एअरफोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सध्या ते हैदराबाद – तेलंगणा येथील एअरफोर्स ॲकॅडमीत प्रशिक्षण घेत आहेत.
या आधीही घनश्याम यांनी ‘सीडीएस’ परीक्षेत संपूर्ण भारतातून १३ वा क्रमांक व एसएसबी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविला होता. तेव्हा त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमीत त्यांचे चार महिन्यांचे प्रशिक्षण केले होते. त्यातच त्यांना डॉक्टरकीची इंटर्नशिप पूर्ण करायची होती. कोणते तरी एकच शिक्षण पूर्ण करता येईल, यासाठी डॉ. घनश्याम यांनी अधिकारीपदाच्या प्रशिक्षणावर पाणी सोडत ‘डॉक्टरकी’ धर्माला प्राधान्य दिले.
डॉ. घनश्याम यांनी त्यांची डॉक्टरकी पूर्ण करून पुन्हा भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पूर्ण जिद्दीने त्यांनी त्यांचा अभ्यास सुरूच ठेवला होता. अखेर, एअरफोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ अर्थात सैन्यदलात अधिकारी होण्याच्या त्यांच्या स्वप्नाला यश आलेच.