पालकमंत्र्यांनी टोचले शिवसैनिकांचे कान ; आपापसात न लढण्याचे दिले आदेश !
जळगाव लाईव्ह न्यूज| ४ जून २०२३ | आपल्याला हरवण्याची ताकद कोणत्याच मायेच्या लाल मध्ये नाहीये. आपल्याला आपणच पाडू शकतो. अशावेळी येत्या निवडणुकांमध्ये आपापसात न भांडता निवडणुकांना सामोरे जा आणि जिल्ह्यावर भगवा फडकवा. असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिले.
जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेनेच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण आता सत्तेत आहोत. संपूर्ण जिल्ह्याला भरघोस निधी आपल्या माध्यमातून दिला जातोय. वैद्यकीय सेवा या नागरिकांपर्यंत पुरवल्या जात आहेत. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही सांगाल तशाप्रकारे मी वागतो आहे. तरीदेखील तुम्ही आपापसात भांडत आहात. अशावेळी याचा फटका हा पक्षाला बसतोय. येत्या काळात आपापले मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा आपल्याला थांबवणारा संपूर्ण जिल्ह्यात कोणीच नाहीये असेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
आपल्या पक्षात राहूनही कित्येक जण पक्षाचा शंभर टक्के काम करत नाहीयेत. पक्षांमध्ये तुम्ही पगारी नाही आहात तुम्ही स्वइच्छे ने पक्षाचं काम करत आहात. अशा वेळी जर तुम्हाला पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाचे विचार हे मान्य नसतील तर तुम्हाला कोणीही थांबवलेलं नाहीये. तुम्ही पूर्ण वेळ पक्षाचे काम करत आहात. यामुळे माझा तुमच्यावर विश्वास आहे. मात्र जर तुम्ही विश्वासघात करत असाल तर तुम्ही स्वतःचाही विश्वासघात करत आहात. हे लक्षात ठेवा उद्या जर तुम्हाला गुलाबराव पाटील हे नावच पक्षात नको असेल तर तसेही सांगा.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपले जे उमेदवार पडले त्यांच्या मते आपल्यातल्या काही लोकांनी त्यांची कामं निष्ठापूर्वी केलेली नाहीयेत. येत्या काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुका येणार आहेत. त्या नक्की कधी येतील हे आपल्याला माहित नाही. पण अशावेळी जर कृषी उत्पन्न बाजार समितीचा वचपा त्यांनी त्यावेळेस काढला तर या आपापसातल्या भांडणामुळे आपल्या पक्षाचे नुकसान होणार आहे. हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या निवडणुकांसाठी कामाला लागलं पाहिजे असं यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.