⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नाथाभाऊ से बीजेपी को डर क्यू लगता है ?

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । एकनाथराव खडसे म्हणजेच संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाथाभाऊ. संपूर्ण राज्याच्या राजकारणात एकनाथराव खडसे यांच्या विरोधातली मत असणारी माणसं आहेत. एकनाथराव खडसे यांच्या सोबत चालणारी किंबहुना त्यांचे मत पटणारीही काही माणसं आहेत. मात्र संपूर्ण राज्यात एकही व्यक्ती नाही जो एकनाथराव खडसे यांना टाळू शकतो. कारण नाथाभाऊ यांची गेल्या ४० वर्षांपासून असणारी दैदिप्यमान राजकीय कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. एकनाथराव खडसे यांच्या कारकिर्दीला गेल्या काही वर्षापासून ग्रहण लागले आहे. नाथाभाऊ यांचे एकेकाळचे निकटवर्तीय असणारे देवेंद्र फडणवीस आता त्यांचे सर्वात मोठे विरोधक बनले आहेत. याच बरोबर एकनाथराव खडसेंसोबत ज्यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढवला रुजवला ते गिरीश महाजन सुद्धा आता एकनाथराव खडसे यांच्यातील वैर आणखीनच वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून एकनाथराव खडसे यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची इच्छा देखील अनेकांनी बाळगली आहे. यामुळे या घडीला राजकारणामध्ये एकनाथराव खडसे एकाकी पडले आहेत.

एकनाथराव खडसेंना विधिमंडळात स्वतःचे स्थान नाही. त्यांची मुलगी विधानसभा निवडणुकीत पडली. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला नाही. यामुळे आता एकनाथराव खडसे यांना विधिमंडळापासून दूर ठेवत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम द्यायचा असाच त्यांच्या विरोधकांचा डाव आहे. मात्र एकनाथराव खडसे एकदा का विधिमंडळात पोहोचले की त्यांना पुन्हा रोखणे अशक्य होईल असे या विरोधकांना चांगलेच माहित असल्यामुळेच या सर्व विरोधकांना एकनाथराव खडसे यांची खऱ्या अर्थाने भीती वाटत आहे.

एकनाथराव खडसे जर विधिमंडळामध्ये गेले तर विरोधी पक्षनेते असताना त्यांनी ज्या प्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवली त्याचप्रमाणे आता नाथाभाऊ विधिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाला जड जाऊ शकतात याची जाण भाजप नेत्यांना आहे. याच मुख्य कारणाने एकनाथराव खडसे यांना मुद्दामून विधिमंडळाच्या बाहेरच ठेवण्यासाठी गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर प्लॅन रचला आहे. नाथाभाऊ यांची वक्तृत्वशैली संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. विधिमंडळात ते ज्याप्रकारे बारकाईने मुद्दे मानतात. ज्या प्रकारे ते विरोधकांचे धिंडवडे काढतात. हे पाहून कोणालाही धक्का बसतोच. यामुळे आता नाथाभाऊंना भारतीय जनता पक्षाला जाणून-बुजून विधिमंडळा बाहेर ठेवायचे असून भाजपाला एकनाथराव खडसे यांची भीती वाटत आहे.

तर दुसरीकडे, एकनाथराव खडसे यांचा हाच गुण भारतीय जनता पक्ष या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील जाणून आहेत. गेल्या वर्षभरापासून किंबहुना जेव्हा पासून महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रावर आली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने विविध पद्धतीने विधिमंडळामध्ये महाविकासआघाडीला बदनाम करायचे किंवा काहीतरी घोटाळे बाहेर काढायचे अनेक प्रयत्न केले आहेत. भाजपवासी त्यात यशस्वी देखील झाले आहेत. मंत्री नवाब मलिक, मंत्री उदय सामंत, मंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडी आणि आरोपांचा ससेमिरा लागला. काहींना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा महाविकासाकडे भारतीय जनता पक्षाचे धिंडवडे काढू शकेल असा विधिमंडळामध्ये एकही नेता नाही. म्हणूनच आता एकनाथराव खडसे यांच्या रुपाने हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसला किंबहूना महाविकासआघाडीला हवा आहे. महाविकास आघाडीची बाजू विधिमंडळामध्ये पूर्ण शक्तीने मांडू शकतील असे नेते नाथाभाऊ हे एकमेव असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ही संधी दिली आहे. याच संधीची भीती आता भारतीय जनता पक्षाला वाटू लागली आहे. तर नाथाभाऊ यांना दगाफटका करून त्यांना विधिमंडळापासून दूर ठेवण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचा आहे. मात्र राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडी ताक देखील फुंकून पीत असल्याने एकनाथराव खडसे यांच्या कोट्यातील मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वाढवली आहेत. म्हणूनच आता हि बातमी ऐकून भारतीय जनता पक्षाच्या गटांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आणि नाथाभाऊ पुन्हा विधिमंडळात आले तर आपलं काय होणार ? अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या गोटात सुरू झाली आहे.