जळगावकरांनो रेनकोट, छत्री घेऊनच बाहेर पडा, पुढचे 24 तास महत्वाचे

मे 4, 2023 11:45 AM

जळगाव लाईव्ह । ४ मे २०२३ । सध्या संपूर्ण भारतातील हवामान सध्या विचित्र झाले आहे. दरवर्षी मे महिन्यात 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाणारे तापमान यंदा मात्र 40 अंशाखालीच आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने कहर केला आहे. आद्यपही अवकाळीचे संकट कायम असून आता हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे

rain jpg webp

हवामान खात्याच्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांना वादळी वारा, ढगांचा गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे २४ तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. जळगावला आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच राज्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यातील या जिल्ह्यांना पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यावर अवकाळीचे ढग कायम असल्याने सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जळगावमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असतो. या दरम्यान, तापमानाचा पारा 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जातो. मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे तापमानाचा पारा 40 अंशाखालीच आहे. यामुळे जळगावकरांना सध्या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळत असला तरी येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढू शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now