जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२३ | नवीन वाळू धोरणानुसार जळगाव जिल्ह्यातील रहिवाशांना आता १ मेपासून ६०० रुपये दराने वाळू उपलब्ध होणार आहे. नव्या वाळू धोरणानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २७ डेपोसाठी जागेची निश्चिती केली आहे. मात्र, पर्यावरण समितीने केवळ आठच घाटांवरुन वाळू उचल करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र वाळू डेपो ही संकल्पना नेमकी कशी आहे? सर्वसामान्यांना ६०० रुपयांमध्ये वाळू कशी मिळेल? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर आज वाळू डेपोची माहिती आज आपण समजून घेणार आहोत.
राज्यातील वाळू लिलाव व बेकायदा वाळू उपसा यामागील राजकारण व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण हाती घेतले आहे. गेल्या जून २०२२ पासून जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे. असे असले तरी यंदा चांगला पाऊस झाल्याने विविध ठिकाणच्या नद्यांमध्ये वाळूचा मोठा साठा झाला आहे. राज्यस्तरीय पर्यावरण समितीने वाळू गटांच्या लिलावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. सोबतच राज्य शासनाने वाळू सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात देण्याचे धोरण निश्चित केल्याने वाळू लिलावाची प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून रखडली होती. आता राज्य शासनानेच वाळूचे दर सहाशे रुपये ब्रास जाहीर केले आहेत.
शेतकऱ्यांनो..! जमिनीच्या आरोग्यासाठी मातीचा नमुना केव्हा आणि कसा घ्यावा?
असा असेल वाळूचा डेपो
वाळूचे दर सहाशे रुपये ब्रास ठेवून प्रत्येक तालुक्यात एक वाळू डेपो असणार आहे. तो डेपो कंत्राटदाराला देण्यात येईल. तो वाळू गटांपासून तर वाळू डेपोपर्यंत वाळू काढून आणेल. जेव्हा नागरिकांकडून वाळूची मागणी होईल तेव्हा तो त्यानेच प्रमाणित केलेल्या डंपर, ट्रॅक्टरमधून वाळू पाठविली जाईल. जो खर्च त्याला येईल त्यातून वाळूचा दर सहाशे रुपयेप्रमाणे नागरिकांकडून घेतला जाईल. खर्चाची उर्वरित रक्कम संबंधित कंत्राटदाराला शासन देणार आहे. शासकीय कामासाठी वाळू राखीव ठेवण्यासाठी काही गट आरक्षित करण्यात येणार आहे. त्यातून फक्त शासकीय कामासाठी वाळू देण्यात येईल. नागरिकांसाठी वेगळे गट वाळूसाठी ठरविण्यात येतील. वाळू डेपोतून निघणार्या वाळूच्या वाहनांना जीपीएस प्रणाली आवश्यक आहे.
पर्यावरण समितीने केन्हाळे, पातोंडी, दोधे (रावेर), तांदळी (अमळनेर), भोकर (जळगाव), धावडे (अमळनेर), बाभुळगाव १ आणि २ (धरणगाव) अशा वाळू घाटांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे एरंडोल, भुसावळ, पारोळा चाळीसगाव, तालुक्यातील वाळू घाटांवरुन वाळूची उचल होणार नाही.
तालुकानिहाय वाळू घाट व डेपोंचे गाव
तालुका वाळू घाट डेपोंचे गाव
जळगाव ०४ किनोद, नशिराबाद (२)
जामनेर ०० देवप्रिंपी
एरंडोल ०१ सावदे, उत्राण (२)
धरणगाव ०४ पाळधी (२), धरणगाव
भुसावळ ०० मिरगव्हाण
यावल ०४ यावल
रावेर ०३ रावेर
अमळनेर ०३ अमळनेर, पातोंडा
चोपडा ०१ निमगव्हाण, धानोरा, चहार्डी
पाचोरा ०० परधाडे, काकोडे
मुक्ताईनगर ०० धाबे, भोकरी, अंतुर्ली
बोदवड ०० बोदवड
भडगाव ०० टोणगाव
पारोळा ०० म्हसवे
चाळीसगाव ०० भोरस