आनंदाची बातमी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता
जळगाव लाईव्ह न्यूज | २ एप्रिल २०२३ | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे “एमडी आणि एमएस” अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मागील महिन्यात आयोगातर्फे महाविद्यालयात पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पाच विभागांसाठी २१ जागा मंजूर केल्या आहेत. यामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जळगावमध्ये मागील मार्च महिन्यात आयोगातर्फे सुविधा, मनुष्यबळ आदी बाबींची तपासणी केली होती. विविध विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाबद्दल माहिती देऊन सादरीकरण केले होते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एमडी व एमएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग व औषधवैद्यकशास्त्र विभागाला प्रत्येकी ७ जागा मंजूर झाल्या आहेत. तर बधिरीकरणशास्त्र विभागाला ४, बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग २, अस्थिव्यंगोपचार विभागाला १ जागा मंजूर झाली आहे. अशा ५ विभागांसाठी २१ जागा एमडी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मंजूर झाल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री ना. गिरीश महाजन यांनी ३० रोजी महाविद्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमातही एमडी तथा एमएस अभ्यासक्रमासाठी जागा मिळाल्याबद्दल अधिष्ठाता आणि विभागांचे कौतुक केले आहे. आगामी काळात पुढील शैक्षणिक वर्षी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
“जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात आणखी इतर विभागांनाही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विभागांना यामुळे आणखी बळ व प्रोत्साहन मिळणार असून अधिकाधिक ऊर्जेने विभाग कार्यरत राहतील. “
- डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.