जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । चाळीसगाव – पाचोरा – जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यांवर रखडलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे मा. आमदार दिलीप वाघ यांच्या नैतृत्वाखाली महाविकास आघाडीतर्फे आज दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे बारावीची परीक्षा द्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
जळगांव ते कजगाव दरम्यान ९ कि. मी. अंतरावर रस्त्यांची चाळणी झाली असुन ९ कि. मी. रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वेळा निवेदने देवुन सुद्धा रस्त्यांचे काम होत नसल्याने रस्ता रोको सारखा पवित्रा घेण्यात येत आला. या रस्त्यावर अनेक निष्पापांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. रखडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावा, यासाठी दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे गट यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता.
विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल
त्यानुसार नांद्रा येथे आज सकाळी १० वाजेला रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. मात्र या आंदोलनामुळे बारावीची परीक्षा द्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दररोज पाचोरा येथून जळगाव येथे नोकरीनिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. आधीच चाकरमान्यांसाठी पाचोरा येथून जळगावी जाण्यासाठी रेल्वेकडून कुठलीही सुविधा नसताना त्यात बससह खासगी वाहनाचा आधार घेऊन जळगाव गाठावे लागते. त्यातच आजच्या रस्ता रोको आंदोलनामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.