जळगाव शहर

कोरोनावर केली मात; मुलांनी चक्क हार घालून केले आईचे स्वागत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील ६० वर्षीय महिलेला कोरोनाबाधित झाल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता. चिंताजनक अवस्थेत त्यांना दाखल केल्यावर पुढील १० दिवस औषधोपचार झाल्यानंतर त्या पूर्ण बऱ्या झाल्या. सोमवारी १० मे रोजी त्यांच्या मुलांनी डिस्चार्ज घेताना चक्क हार घालूनच आईचे स्वागत करीत घरी नेले. हि सुखावह घटना घडली, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात.

नगरदेवळा येथील शेतकरी कुटुंबातील पाटील परिवारातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ताप येणे, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवायला लागली. तसेच, ऑक्सिजन घेण्यास त्रास व्हायला लागला. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावात ३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांचा ऑक्सिजन ७० ते ७२ दाखवीत होता. त्यांचा एचआरसिटी स्कोअर हा २० होता. त्यांना त्वरित ऑक्सिजन मास्क लावून औषधोपचार सुरु करण्यात आले.

अखेर १० व्या दिवशी वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करून या महिला पूर्ण बऱ्या झाल्या. सोमवारी त्यांना वॉर्ड क्रमांक ९ मधून डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी ९ रोजीच ‘मदर डे’ साजरा झाला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी महिलेच्या मुलांनी आईसाठी फुलांचा हार आणून गळ्यात टाकीत स्वागत करीत घरी नेले. यावेळी डॉ. संजय धुमाळे, वॉर्ड इन्चार्ज अधिपरिचारिका शैला शिंदे, अधिपरिचारिका नसरीन शेख उपस्थित होते. येताना स्ट्रेचरवर अत्यवस्थ स्थितीत आलेली आई जाताना स्वतःच्या पायाने चालत घरी गेली म्हणून मुलांनी वैद्यकीय यंत्रणेचे आभार मानले. ६० वर्षांची आमची आई घरी परत येईल अशी आम्हाला खात्री वाटत नव्हती. तुम्ही आमच्यासाठी देव आहात, अशी प्रतिक्रिया मुलांनी डॉक्टरांकडे व्यक्त केली.

“कोरोनाबाधित झाल्यावर रुग्ण अत्यवस्थ होत असेल आणि त्याला वेळेत उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले तर नक्कीच तो  बरा होऊ शकतो. कुठलीही भीती न बाळगता, निःसंकोच रुग्णालयात रुग्णांनी दाखल व्हावे.”

– डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button