जळगाव लाईव्ह न्यूज | १८ फेब्रुवारी २०२३ | ग्रामीण भागातील तरुणांचा पोलीस भरती किंवा सैन्य भरतीकडे ओढा जास्त असतो. जळगाव जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक गावातील किमान एक तरी तरुण सैन्यदलात भरती झाला आहे. मात्र जिल्ह्यातील एक गाव असे आहे की ज्या गावाने देशाला ३०० पेक्षा जास्त सैनिक दिले आहेत. हे गाव म्हणजे, पाचोरा तालुक्यातील सामनेर! या गावातील ३०० पेक्षा जास्त तरुण भारतीय सैनिक दल, सशस्त्र सीमा बल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रिअल फोर्स, इंडो तिबेट पोलीस फोर्स व महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. या मुळे या गावाला सैनिकांचे गाव (Soldiers Village) म्हणून देखील ओळखले जाते.
स्वातंत्र्यलढ्यापासून आज तगायत देशाच्या रक्षणार्थ लढणार्या सैनिकांचे गाव म्हणून पाचोरा तालुक्यातील सामनेर गावाची ओळख आहे. अवघ्या पाच हजारावर लोकसंख्या असलेल्या या गावाने देशाला अनेक शुरुवीर दिले आहेत. सामनेर येथील सैनिकांच्या कारगिलच्या लढ्यात देखील जवानांचा सहभाग प्रत्यक्ष होता. लष्कराच्या अनेक मोहिमांमध्ये सामनेरच्या शुरांनी शौर्य गाजवले आहे. या गावातील तरुण सैन्य दलात शिपायापासून ते सुभेदार, कॅप्टनपदापर्यंत कार्यरत आहेत.
स्वांतत्र्य लढ्यातही सक्रिय सहभाग
या गावातील तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सक्रिय सहभाग घेतला आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावात पूज्य साने गुरुजींनी गावात छुप्या पध्दतीने सभा घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात तरुणांना सहभागी करून घेतले होते. त्यातून ब्रिटिशांच्या विरोधात मोठी फळी तयार झाली होती. आताच्या पिढीने गावाची ही गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात भरती होण्याकरिता गावातील तरुणांचा ओढा कायम आहे. सैन्यदलात सेवा बजावल्यानंतर अनेक जण माजी सैनिक महाराष्ट्र पोलीस दल व विविध क्षेत्रात नोकरी करत आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.