जळगावच्या व्यापाऱ्यांना गंडविणारे तिघे जाळ्यात

मे 10, 2021 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । शहरातील विविध व्यापाऱ्यांकडून टाईल्स, कढई, शेगडी, प्लायवूड असे लाखोंचे साहित्य खरेदी करून त्यांना बनावट धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला रविवारी रात्री रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप मिरचंद माखीजा (रा. जळगाव), राहूल हिरालाल वाधवानी, हरिषकुमार उर्फ राहूल शोभराजमल पेशवानी (दोघे रा. इंदूर) यांना अटक केलेल्या आरोपींचे नाव असून या तिघा संशयितांनी माल खरेदी करुन व्यापाऱ्यांची तब्बल एकूण ९ लाख ४० हजार ८८० लाखो रुपयांची फसवणूक केली होती.

crime

काय आहे प्रकरण?

खोटेनगर येथील अंबिका बिल्डर्सकडून प्रदीप माखीजा, राहूल वाधवानी व हरिषकुमार पेशवानी या तिघांनी ६४२ टाइल्सचे बॉक्स खरेदी करुन त्यापोटी दुकानमालकाला ७ लाख ६ हजार २०० रुपयांचा जळगाव शहरातील युनियन बँकेचा धनादेश दिला होता. प्रदीप माखीजा यांच्या नावाचा धनादेश बँकेत वटवण्यासाठी दिला असता, बँकेत रक्कम नसल्याने तो वटला नाही. फसवणुकीची खात्री झाल्यावर अंबिका बिल्डर्सचे संचालक प्रशांत शांतीलाल पटेल (वय ३३ रा. गणपती नगर यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाचप्रकारे शहरातील अमर किचन वेअरचे संचालक जगदीश दादूमल मंधान (रा. गणपती नगर) यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे कुकर व स्टील खरेदी करुन संशयितांची फसवणूक केली होती. तसेच ईच्छादेवी चौकातील गोदावरी प्लायवूडचे परेश जगदीश तलरेजा (रा. सिंधी कॉलनी)यांच्याकडून ८९ हजार ६८० रुपये किंमतीचे प्लायवूड खरेदी केले व त्याबदल्यात न वटणारा धनादेश देवून फसवणूक केली होती.

रविवारी शहरातील जितेंद्र इलेक्ट्रीकल्स अँड मल्टी ट्रेडींग कंपनीचे मालक सुशील संपतलाल पिंचा यांच्याकडून संशयित १२० सिलिंग फॅन खरेदी करणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरिक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून तिघांना अटक केली.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक यांच्या सुचणेनुसार जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ हरीलाल पाटील, पोहेकॉ वासुदेव मराठे, पोना विश्वनाथ गायकवाड, पोकॉ महेंद्र सोनवणे व पोकॉ अभिषेक पाटील यांनी हि कारवाई करत तिघांना अटक केली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now