मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा : जळगावात शिवसेना आक्रमक
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठाकरे गटाने शहर पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन केले. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंना ‘नटी’ म्हटल्याचा आराेप करत ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यात महिला पदाधिकारी अजूनच आक्रमक झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
महाप्रबाेधन यात्रेच्या निमीत्ताने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीन दिवसिय जळगाव दाैरा केला. यावेळी त्यांनी सर्व बंडखोर आमदारांना धारेवर धरले. पर्यायी माध्यमांशी बाेलताना पालकमंत्री पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाला ‘सिनेमा’ आणि सुषमा अंधारे यांना ‘नटी’ म्हटल्याने महिलांचा अवमान झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांविराेधात गुन्हा दाखल करा. अशी मागणी ठाकरे गटातर्फे करण्यात आली. यासाठी रविवारी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, महापाैर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शहर पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढला.
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महापाैर महाजन, अॅड. ललिता पाटील, गजानन मालपुरे यांच्यासह शिष्टमंडळाने शहर पाेलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे महिला वर्गाचा अवमान झाला असून त्यांनी यापुर्वी देखिल असे विधाने केली आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली.