जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । शहरातील बसस्थानकाजवळील शिवस्मारकाची नियोजित जागा अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीसाठी जनसेवक विनोद नामदेव पाडर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने मंगळवारी त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र बोदवड पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकार्यांनी प्रसंगावधान राखत परीस्थिती हाताळल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी पाडर यांना लेखी समज देऊन रवाना केले आहे.
अतिक्रमण हटवण्यासाठी दिला होता इशारा
बोदवड शहरातील मुक्ताईनगर ते मलकापूर या रस्त्यामध्ये बस स्थानकाजवळील काटकोनातील जागेत नियोजित शिवस्मारक उभारण्यासाठी जनसेवक विनोद पाडर यांनी प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला मात्र नियोजित जागेवर काही व्यापार्यांनी अतिक्रमण केल्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. ही बाब महसूल प्रशासनाची आहे, असे सांगण्यात आले. 4 जानेवारी 1981 मध्ये तत्कालीन बोदवड ग्रामपंचायतीने या जागेचा ठराव शिवस्मारकासाठी केला होता, तशी नोंद कार्यालयाच्या दप्तरी आहे. म्हणून ही जागा आज रोजी मोकळी करून मिळावी, व त्या ठिकाणी भव्य शिवस्मारक उभारावे, अशी मागणी जनसेवक पाडर यांनी केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून या संदर्भातील निवेदने लेखी स्वरुपात बोदवड नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांना पाडर यांनी दिले होते व 31 ऑक्टोबर पर्यंत या संदर्भात प्रशासनाने दखल घेतली नाही, तर 1 नोव्हेंबर रोजी बोदवड नगरपंचायत कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करेल, असा इशारा जनसेवक पाडर यांनी दिला होता. त्यानुसार 1 नोव्हेंबर रोजी शेकडो नागरीक बोदवड विश्रामगृहावर सकाळी साडेदहा वाजता गोळा झाले आणि तेथून हा मोर्चा जनसेवक विनोद पाडर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत गेला. या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मुक्ताईनगर- मलकापूर चौफुलीवर हा मोर्चा धडकला. याच ठिकाणी छत्रपतींचे स्मारक निर्माण करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी डॉ.उद्धवराव पाटील यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.त्
अचानक ओतले पेट्रोल
मोर्चा शिवद्वाराजवळ पोहोचला, या ठिकाणी नगराध्यक्ष आनंदा पाटील तथा शिवप्रेमी रब्बानी पटेल यांनी शिवद्वारावरील शिवप्रतिमेला माल्यार्पण केले. त्यानंतर पाडर यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयासमोर मोर्चा स्थिरावला. या ठिकाणी काही मान्यवरांची भाषणे सुरू असतानाच विनोद पाडर यांनी अचानक पेट्रोलने भरलेली कॅन हाती घेतली आणि स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आत्मदहनाचा डाव हाणून पाडला. त्यानंतर मुख्याधिकारी आकाश डोईफोडे तथा नगरपंचायत प्रशासन यांनी विनोद पाडर यांना तोंडी आश्वासन दिले व 2 नोव्हेंबर रोजी नगरपंचायत प्रशासन या संदर्भात महत्त्वाची बैठक घेऊन नियोजित जागेवर शिवस्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.