जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित मोफत महाआरोग्य चिकित्सा, औषधोपचार व शस्त्रक्रिया शिबिरातील पात्र रुग्णांच्या सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या महाआरोग्य शिबिराचा विविध आजारांच्या सुमारे दोन हजार रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात सहभाग नोंदविणाऱ्या रुग्णांना कुठल्याही जाती, धर्म व उत्पन्न मर्यादेची अट नव्हती. त्यामुळे शिबिरास मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभला.
२९ ऑक्टोबर रोजी सकाळी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह आमदार अनिल पाटील, माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ, लिज्जत पापड उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा अखिल भारतीय रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कोते,ख्यातनाम बिल्डर तथा पुणे जिल्हाध्यक्ष संतोष बारणे, सहमहाव्यवस्थापक अशोक शिंदे, रोशन मराठे, संचालक भास्करराव काळे, निवेदक भाऊसाहेब कोकाटे, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश झाल्टे, प्रकल्प संचालक नंदू रायगडे, डॉ. कुणाल चौधरी, ‘कबचौउमवि’च्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, सदस्या सौ. जयश्री पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जि. प.सदस्य डॉ. हर्षल माने, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे दीपप्रज्वलन व फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष श्री. एस. एन. पाटील, सचिव
एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे तसेच डी. ए. सोनवणे, आनंद महाले, विनोद कदम , निलेश महाजन, राहुल पाटील,आर.जे.पाटील, ऊमाकांत हिरे यांच्यासह अमळनेर शहरातील तज्ज्ञ डॉक्टर्स, केमिस्ट व अनेक सेवेकरी उपस्थित होते. केमिस्ट संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोफत औषधे उपलब्ध करून दिली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी महाआरोग्य शिबिर आयोजनासंदर्भातील भूमिका विशद केली. महाआरोग्य शिबिरात मुंबई, पुणे, नाशिकसह अमळनेर येथील विविध आजारांच्या जवळपास ४० वर तज्ज्ञांकडून रुग्ण तपासणी, चिकित्सा व उपचार करण्यात आले. त्यात सुमारे दीडेशवर रुग्णांना कोटयवधी रुपये खर्चाच्या शस्त्रक्रियांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व शस्त्रक्रिया मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणार आहेत.
शिबिराची ठळक वैशिष्टये
मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून लवकरच अमळनेर बसस्थानकानजीक क्षुधाशांती केंद्र उभारले जाईल. तसेच यापुढील काळात विविध आजारांची स्वतंत्ररीत्या शिबिरे आयोजित केली जातील, अशी अध्यक्ष डिगंबर महाले यांच्याकडून घोषणा.
शिबिरात ऐनवेळी नावनोंदणीसाठी उसळली गर्दी.
मंगळग्रह मंदिरात एकाच छताखाली २४ वर कक्षांद्वारे विविध आजारांची तपासणी.
नेत्ररुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप.
शिबिरस्थळी ई.सी.जी., एक्स-रे, रक्त तपासणी आदींची मोफत सुविधा.
अनेक रुग्णांना मोफत औषधींचे वाटप.
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे अनेकांकडून तोंडभरून कौतुक.
जळगाव जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतून आलेल्या रुग्णांकडूनही समाधान व्यक्त.
शिबिरस्थळी राज्यातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या भेटी.