मोठी बातमी : या रस्त्यांच्या कामाला झाली सुरुवात
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरात गेल्या वर्षभरापासून 12 कोटींच्या विशेष रस्ता अनुदानातून खडीकरण झालेल्या रस्त्यांवरील सिलकोट व कार्पेटची कामे मे महिन्यापासून रखडली होती. पावसाळ्यात पाच महिने या रस्त्यांना पून्हा ब्रेक लागला. मात्र आता दिवाळीनंतर या रखडलेल्या रस्त्याच्या कामांना सुरवात झाली आहे. सध्या प्रभाग 22 मधील कामे सुरु असून मार्च अखेरपर्यंत शहरातील सर्व 23 प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची रखडलेली कामे पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे खड्डेमय तसेच खडीकरण झालेल्या खडबडीत रस्त्यांवरुन प्रवास करणार्या भुसावळकरांना दिलासा मिळणार आहे.
नागरीकांना काहीसा दिलासा
पालिकेने गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपूर्वी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरु केले. केवळ खडीचा पहिला थर टाकल्यांनतर उर्वरित सिलकोट व कारपेटचे काम अपूर्ण ठेवले. या रस्त्यांवर आता पाऊस झाल्यानेे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्त्यांचे कामे आता ठेकेदाराने पून्हा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यानुसार प्रभाग 22 मधील भिरुड हॉस्पीटल ते बियाणी स्कूल, प्राफेसर कॉलनी, आनंद नगर ते बंधन बॅक, जय मातृभुमी चौक, डॉ. मानवकर हॉस्पीटल मानवतकर चौक, आनंद नगर मुख्य रस्ता, कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, राजेश्वर नगर फेज वन आदी मार्गाचे रस्त्यांचे काम सुरु करण्यात आली आहेत. माजी नगरसेवक किरण कोलते यांनी पाठपुरावा करुन ही कामे करुन घेतली असल्याने या भागातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
आठवड्याभरात या रस्त्यांनाही मुहूर्त
प्रभाग 22 मधील रस्त्यांची कामे झाल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील ब्राह्मण संघ ते नृसिंग मंदिर, जवाहर डेअरी समोरील मार्ग, मुख्य बाजारपेठेसह शनीमदिर वॉर्डातील कामांना आठवड्याभरात गती दिली जाणार आहे. बीबीएम झालेल्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या भागांमध्ये अमृत योजनेच्या खोदकामामुळे माती बाहेर आली. तसेच आबडधोबळ असलेल्या मार्गावर मात्र सिलकोट व कार्पेटची कामे होणार नाहीत. रस्त्यांचे मजबूतीकरण नाही, अशा डब्लूबीएम न झालेल्या रस्त्यांची कामे रेंगाळणार आहेत.
तिसर्यांदा मिळेल मुदतवाढ?
पालिकेने विशेष रस्ता अनुदान योजनंतर्गत 23 कामांचे सुमारे 12 कोटी रुपयांचे काम मे. विनय सोनू बढे अँड कंपनी या ठेकेदाराला दिले होते. या कामासाठी ऑगस्ट 2020 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. विशेष रस्ता अनुदान निधी खर्च करयाची मुदत 28 मार्च 2022 पर्यंत होती.या कामांसाठी ठेकेदाराला आता 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र ठेकेदाराने विशेष रस्ता अनुदानाचा निधीसाठी शासनाने 31 मार्च 2023 पर्यंतच्या मुदतीत काम पूर्ण करण्याची मुदत मागितली आहे.
ठेकेदाराचे बिल अडकले
पालिकेवर सध्या प्रशासकिय राजवट आहे. या कालावधीत राजकिय दबाव नसल्याने काही अधिकारी व कर्मचारी पूर्णवेळ कार्यालयात उपलब्ध नसतात. आठवड्यातून केवळ पाच दिवस काही अधिकारी कामावर येतात. यामुळे कामावर परिणाम झाला आहे. कामे करुनही ठेकेदाराचे तब्बल 40 लाख रुपयांची बिले मिळाली नाहीत. आगामी काळातही बिले रखडल्यास शहरातील रस्त्यांची कामे नाईलाजाने थांबवावी लागतील. बिल मिळाल्याशिवाय कामे कसे होणार असा प्रश्न ठेकेदार विनय बढे यांनी सांगितले.
या बीबीएम रस्त्यांवर होणार कारपेट
जेतवन रिक्षा स्टॉप ते ध्यान केंद्र, मैनाबाई नगर, प्रभाग क्रमांक सात राम मंदिर ते मुंजोबा मंदिर, भुसावळ हायस्कूल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्डातील भाग, शिवाजी नगर परिसरातील सर्व गल्ली व प्रमुख रस्ते, प्रभाग क्रमांक 14 मिल्लत नगर परिसर, पाटील मळा परिसर, हॉटेल अनिल, ब्राह्मण संघाचा मुख्य रस्ता, न्यू एरिया वॉर्ड परिसर, गांधी चौकी ते स्टेशन रोड, डॉ. आंबेडकर पुतळा भाग, गडकरी नगरचा काही भाग.