जळगाव जिल्हाभुसावळ

वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍यांवर पोलिसांकडून होणार कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील बाजारपेठेत दिवाळीमुळे ग्राहकांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर गुरुवारी बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी बाजारपेठेची पाहणी करीत रस्त्यातच हातगाड्या लावणार्‍या व्यावसायीकांची कान उघाडणी केली तर दुकानातील सामान रस्त्यापर्यंत आणणार्‍या व्यापार्‍यांना तंबी देत तत्काळ सुधारणा न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

दिवाळी सण असल्यामुळे शहरातील जवाहर डेअरी ते अप्सरा चौक आणि पुढे मरीमातेच्या मंदिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणार्‍यांनी हातगाड्या लावल्या आहेत. पणती विक्रेते, केरसुणी, पूजेचे साहित्य, स्टीकर, रांगोळी आदी वस्तूंची विक्री करणार्‍या व्यावसायीकांनी आपल्या हातगाड्या वाहतुकीला अडचण होईल अशा पद्धत्तभने उभ्या केल्याने दुकानदारांसोबतच नागरीकांनादेखील पायी चालवण्यास तसेच वाहन काढण्यास अडचण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी व्यापारीपेठेतील व्यापार्‍यांसह हातगाड्या लावणार्‍या व्यावसायीकांना कायदेशीर भाषेत तंबी देत कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी व्यापार्‍यांनी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या हातगाडी व्यावसायीकांच्या तक्रारी केल्या होत्या.

गुरुवारी निरीक्षक राहूल गायकवाड, सहा.निरीक्षक स्वप्नील नाईक, सहा.पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारी यांनी बाजारपेठेत जाऊन रस्त्यावरील वाहनधारकांना प्रथम समज दिली जर यात सुधारणा नाही झाली तर थेट कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा निरीक्षक गायकवाड यांनी दिला. पोलिसांनी दिलेल्या इशार्‍यानंतर हातगाडी चालकांनी सुधारणा न केल्यास त्यांच्यावर आता कायदेशीररित्या कारवाई होणार आहे.

Related Articles

Back to top button