Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । महसूल खात्याने जप्त केलेले डंपर सोडण्याच्या मोबदल्यात दिड लाखांची लाच मागून ती स्वीकारताना अमळनेर शहरातील तलाठ्यासह मंडळाधिकार्याला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गणेश राजाराम महाजन (46, रा.नवीन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव) असे अटकेतील तलाठ्याचे तर दिनेश शामराव सोनवणे (48, रा.फरशी रोड, अमळनेर) असे मंडळाधिकार्याचे नाव आहे. 30 वर्षीय तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे तीन डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रमांक एम.एच.18 -1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. या डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे तलाठी व मंडळाधिकार्यांनी 12 रोजी दिड लाखांची लाच मागितली होती. जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी दुपारी अमळनेर तलाठी कार्यालयात आरोपींना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक नार्धन चौधरी, नाईक किशोर महाजन, पोलिस नाईक बाळु मराठे, पोलिस नाईक सुनील वानखेडे, नाईक ईश्वर धनगर, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, पोलिस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, पोलिस कॉन्स्टेबल सचिन चाटे, पोलिस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.