जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । शहरातील मोहाडी रोड परिसरातील राधेश्याम कॉलनीत बंद घर फोडून सुमारे २ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी रेाडवरील हटकर मंदिराजवळील राधेश्याम कॉलनीत हर्षा गोविंदा भागवानी (वय २७) या पती, सासू व सासरे अशा कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. गुरुवारी (ता. ६) हर्षा भागवानी पतीसह मुंबईला गेल्याने सलग तीन दिवस घर बंद होते.
घराला कुलूप लावल्याची रेकी करून चोरट्यांनी मुख्य दाराचा कडीकोयंडाच कटरने कापून आत प्रवेश केला. घरातील १४ हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख २७ हजारांचा ऐवज नेला आहे. हर्षा भागवानी मुंबईहून बुधवारी परतल्या असून, घरफोडी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.