Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । जलजीवन मिशन योजने अंतर्गत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने व आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने शिंदाड व कजगाव या २ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पाचोरा तालुक्यातील शिंदाड व भडगाव तालुक्यातील कजगाव या गावांचा समावेश आहे. यासाठी तब्बल १० कोटी ३६ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आ.किशोर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील २६ गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी ५२८ कोटी ५४ लक्ष रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यातील १६ गावांच्या ३४८ कोटी ६२ लक्षच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील २८७ कोटी ६७ लक्षच्या १२ योजनांची कार्यादेश देण्यात आलेले आहेत. आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मागणीनुसार शिंदाड व कजगावला पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्याने तेथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीचा धडाका ना.गुलाबराव पाटील यांनी सुरू केला आहे. जिल्ह्यांतील आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनुसार मंत्रालयात ना.गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती. त्यात जिल्ह्यातील २ मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना ना. मंजुरी देण्याचे निर्देशही दिले होते. जिल्ह्यातील लहान मोठ्या गावांचे जास्तीत जास्त प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. दरम्यान या पाणी पुरवठा कामांच्या अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, पाईपलाइन,पाण्याची टाकी आदी कामे केली जाणार आहेत. या संदर्भात बोलतांना आ.किशोर अप्पा पाटील म्हणाले की, एकीकडे लहान आणि मध्यम लोकसंख्येच्या गावांच्या योजनांसाठीचा जिल्ह्यातील कृती आराखड्यानुसार योजनांनाची कामे सुरू झाली आहेत. तर सोबतच मतदार संघातील तुलनेने मोठ्या असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा योजनांना सुध्दा आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मतदारसंघातील ज्या गावांना पाणीपुरवठ्याच्या योजना नाहीत अशा सर्व गावांना पाणी पुरवठा योजना मंजुरी साठी आपण पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्फत प्रयत्न केले असून काही गावांची निविदा प्रक्रिया झाली असून काही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. किशोर पाटील, आमदार पाचोरा-भडगाव