जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । शिंदे गटाचे सदस्य आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरीने आयोजित केलेल्या खान्देशस्तरीय कृषी प्रदर्शनाला हजेरी लावली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील हजर होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टोला लगावला.

नेमकं काय म्हणाले सत्तार?
श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरीने आयोजित केलेल्या खान्देशस्तरीय कृषी प्रदर्शनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. मात्र पाटील यांना नियोजन समितीच्या आढावा बैठकीला जायचे असल्याने त्यांनी कार्यक्रमातून जायचे होते. त्यांनी भाषणात तसे सांगितले देखील. त्यावर सत्तार यांनी म्हटले की, गुलाबराव पाटील यांनी माझ्यासाठीही एखादा तास ठेवला असता तर बरे वाटले असते. इथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे, माझी गणती येरा गबाळ्यात करू नका, असा टोलाही गुलाबराव पाटील यांना लगावला.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील हे उठले आणि नियोजन समितीच्या बैठकीला निघून गेले.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सत्तार म्हणाले की, सीएमव्हीबाबत शासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यानंतर नुकसान भरपाई कशी द्यावी, त्यावर विचार केला जाईल. विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना सक्षम करण्यासाठी पोकरा योजनेचा लाभ दिला गेला आहे. त्यासाठी शासनाने बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यात २५०० कोटींचा खर्च झाला आहे. पुढे १५०० कोटी शिल्लक आहेत. ही योजना वाढवण्यासंदर्भात शासनस्तरावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. पुढील अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला झुकते माप दिले जाणार आहे. शासनाने जुलैमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई ही साडेचार हजार कोटींची सप्टेंबरमध्येच भरपाई दिली आहे.











