जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अशातच हवामान खात्याने पावसाचा पुन्हा इशारा दिला आहे. हवामान खात्याने 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यात जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात 26 सप्टेंबरला नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातुर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 27 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद आणि लातुरात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातुरात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्यात 27, 28 आणि 29 सप्टेंबरला पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. राज्यात सरासरीपेक्षा 24 टक्के पाऊस अधिक झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
महाराष्ट्रातून मान्सून निरोप घेणार
5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.











