जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर असलेल्या वाघ चेंबरमध्ये मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. अपार्टमेंटमधील चार कार्यालयसह एक मोबाईल दुकान चोरट्यांनी लक्ष केले आहे. दुकानातून महागडे आयफोन आणि सॅमसंग मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे. विशेष म्हणजे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर देखील चोरटे सोबत घेऊन गेले आहेत. Mobile shops broken into in Jalgaon city, expensive iPhones stolen.
जळगावात चोरटे पुन्हा सुसाट झाले असून दुचाकी चोरीसह घरफोडी देखील वाढली आहे. गोलाणी मार्केटसमोर विनीत आहुजा यांच्या मालकीचे आय फोनवाला हे दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले.सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानातील वरील मजल्याची लाकडी फळी कुणीतरी तोडलेली होती तर सामान अस्ताव्यस्त पडलेला होता.
रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी वाघ चेंबर आपले लक्ष केले. अपार्टमेंटमधील जवळपास ४ कार्यालयाचा कडीकोंडा चोरट्यांनी तोडला आहे. सुदैवाने तिथून फारसे काही चोरी झालेले नाही. आय फोनवाला दुकानाच्या वरील मजल्यावरून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील ६ हजार रुपये रोख, महागडे ६ आयफोन आणि २ सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे.
चोरट्यांनी दुकानातील एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर देखील चोरून नेला आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह डीबी कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणे सुरु असून ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले आहे. परिसरात यापूर्वी रेकी करून चोरी करण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.