जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । अंजनी नदीपात्रात बुडून दोन वर्षीय चिमुकला मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनू सुरेश बारेला (वय-२, रा. सबखेडा ता. धरणगाव) असे मयत झालेल्या बालकाचे नाव असून याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असं की, धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील दिलीप पाटील यांच्या खळ्यात सोनू बारेला हा चिमुकला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. गावातील काही शेतकरी हे शेतात जात असतांना सतखेडा गावातील स्मशानभूमी जवळील अंजनी नदीपात्रामध्ये सोनू बारेला या चिमुकल्याचा पाण्यात बुडाल्याचे दिसून आले.
त्यावेळी त्यांनी तातडीने धाव घेत त्याला धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. हा चिमुकला पाण्यात कसा गेला ? याबाबत कोणतीही माहिती अजून मिळाली नाही. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे करीत आहे.