जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेक बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशातच आता आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील एका बँकेला कायमचे कुलूप लागणार आहे. या बँकेत पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांना उद्यापासून पैसे काढता येणार नाहीत, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले.

या बँकेचा परवाना रद्द
ऑगस्टमध्ये आरबीआयने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank Limited) परवाना रद्द केला होता. 22 सप्टेंबर रोजी आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर बँकिंग सेवा बंद राहतील. आरबीआयने जारी केलेल्या नोटीसमध्ये बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

परवाना रद्द करण्याचे कारण
22 सप्टेंबर रोजी बँक आपला व्यवसाय बंद करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. यानंतर बँक ग्राहक ना पैसे जमा करू शकणार आहेत ना खात्यातून काढू शकणार आहेत. याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाणार नाहीत. बँकेकडे भांडवल नाही आणि पुढे कमाई होण्याची शक्यता नाही, असे आरबीआयकडून सांगण्यात आले. यामुळेच बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या पैशाचे काय होणार?
ज्या ग्राहकांचे पैसे या बँकेत जमा आहेत त्यांना RBI च्या डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) विमा योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या नियमानुसार, जर एखादी बँक खराब आर्थिक स्थितीमुळे बंद असेल, तर ग्राहकाला डीआयसीजीसीद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. हे पैसे संबंधित ग्राहकाला दिले जातात.












