⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव पोलिसांच्या मागे लागलेले ‘शुक्लकाष्ठ’ संपणार कधी?

जळगाव पोलिसांच्या मागे लागलेले ‘शुक्लकाष्ठ’ संपणार कधी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीसदलाच्या मागे सध्या पितृपक्षात शुक्लकाष्ठ लागलेले आहे. पितृपक्ष म्हटले कि चांगला काळ. प्रत्येकाच्या घरी आपल्या पितरांना जेवू घातले जाते. असे म्हणतात कि या काळात आपले सर्व पूर्वज पृथ्वीवर असतात. पोलीस प्रशासनाचे मात्र सध्या ग्रहमान काही ठिकाणावर नाही. जिल्हा पोलीसदलाच्या मागे शुक्लकाष्ठ लागले असून महिनाभरापासून काही ना काही अडचणी येत आहेत. तीन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित व्हावे लागले असून दोघांवर कारवाईची टांगती तलवार आहे. When will the chase of Jalgaon police end?

जळगाव जिल्हा पोलीस दल नेहमीच चर्चेत राहिले आहे. जळगाव पोलीस प्रशासन कधी धडाकेबाज कारवाईमुळे गाजले तर कधी लाचखोरीच्या सापळ्याने बदनाम झाले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (IPS Pravin Mundhe) यांना जळगावचा पदभार घेऊन जवळपास दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. पोलीस अधीक्षकांनी आजवरचा कार्यकाळ उत्तमरीत्या सांभाळला. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी सांभाळून घेतले. जो १०० टक्के चुकला त्याला शिक्षा केली आणि ज्याची चूक जाणूनबुजून नव्हती अशांना त्यांनी संधी दिली.

गेल्या महिन्याभरापासून जळगाव पोलीस प्रशासन चांगलेच चर्चेत आले आहे. श्रावणात भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला तर गणेशोत्सवात बाप्पा नाराज झाले असेच सध्या चित्र आहे. दि.५ सप्टेंबर रोजी चोपडा शहरातील रहिवासी माजी सैनिक पंकज पाटील हे आपल्या मुलाला घेऊन बाजारात गेले होते. तहसील कार्यालयाजवळ फुलहार घेत असताना रस्त्यावर उभे होते. यावेळी गाडी पार्कींगच्या क्षुल्लक कारणावरून पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण (PI Avtarsing Chavhan) यांनी पंकज पाटील यांना रस्त्यावर थांबून अरेरावी व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत पुन्हा मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमुळे पाटील यांना दुखापत झाली असून निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे.
हे देखील वाचा : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट : पोलीस विरुद्ध ग्रामस्थ आल्याने तणाव, दगडफेक

गणेशोत्सव काळात धानोरा येथे सातव्या दिवशी गणेश विसर्जन सुरु असताना अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण दांडगे (Kiran Dandage) यांनी पोलीस बळाचा उपयोग केला होता. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. सहाय्यक निरीक्षक किरण दांडगे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेत ग्रामस्थांनी निवेदन देखील दिले आहे. पोलीस अधिक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

दोघांचे निलंबन होणार कि नाही किंवा त्यांच्यावर काय कारवाई होणार हे अद्याप निश्चित नसले तरी इतर तिघांवर मात्र कारवाई झाली आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांना निलंबीत करून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तसेच बकाले यांची खात्यांतर्गत चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. बकाले यांनी फोनवरून बोलणे केलेला सहाय्यक फौजदार अशोक महाजन (Ashok Mahajan) याला देखील डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे. वरिष्ठांना न कळविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हे देखील वाचा : आक्षेपार्ह वक्तव्य : ऑडिओ क्लीपप्रकरणी बकालेंच्या पाठोपाठ सहाय्यक फौजदार महाजन देखील निलंबित!

अगोदरची प्रकरणे कमी होती कि काय त्यात आणखी एक भर पडली. गेल्या महिन्यात निवृत्ती नगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. दरम्यान, या घटनेच्या काही दिवस आधी भूषण सपकाळे याने गावात तमाशाचे आयोजन केले होते. तेथे भटू वीरभान नेरकरसह एका अन्य कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे नेरकरला निलंबित करण्यात आले तर दुसऱ्याची चौकशी सुरु आहे.

गेल्या वर्षी देखील शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती समारंभ पार्टीत भुसावळ येथील अनिल चौधरी यांची हजेरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी धरलेला ठेका चांगलाच चर्चेत आला होता. काही महिन्यांपूर्वी चाळीसगाव येथे देखील पोलिसांच्या खांद्यावर बसून नाचणारे पोलीस निरीक्षक आणि कीर्तन सोहळ्यात गादीवर बूट घालून जाणारे निरीक्षक के.के.पाटील यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. नुकतेच महापौर जयश्री महाजन यांच्या घरी गणेश विसर्जनाला झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर ‘जळगाव सुरक्षित नसून नागरिकांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी. पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे जोरात सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
हे देखील वाचा : माजी सैनिकाला पोलिसांकडून मारहाण, खासदार रक्षा खडसेंनी घेतली भेट

एकीकडे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरु असतांना एकावर एक संकटे येतच आहेत. पोलीस प्रशासनाची प्रतिमा महिनाभरात मलीन झाली असून पोलिसांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे हे प्रचंड संयमी असून त्यांच्या याच भूमिकेमुळे पोलीसदलात शांतता टिकून आहे. तसेच लोकप्रतिनिधींशी देखील त्यांचा जनसंपर्क चांगला असून सर्वांच्या सूचनांचे ते स्वागत करीत असल्याने कोणताही वाद असो लवकर आटोक्यात येत आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणे एकटे पोलीस अधीक्षकांचे काम नसून इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील त्यांना साथ देणे आवश्यक आहे.

विशेषतः पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यापुढे ताक देखील फुंकून पिणे आवश्यक झाले आहे. कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणे असो किंवा कुणाशी चर्चा करताना देखील सावधानता बाळगणे पोलिसांना आवश्यक आहे. पितृपक्ष संपेल आणि नवरात्रीत दुर्गामाता जिल्हा पोलीस दलावर आपली कृपादृष्टी दाखवेल इतकीच प्रार्थना सध्या पोलीस करीत असतील.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.