जळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी ; केव्हा होणार आजचा पाणीपुरवठा?
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक मोठी बातमी आहे. गेल्या दोन दिवसापासून शहराला होऊ न शकलेल्या पाणीपुरवठा आज शनिवारी अनिश्चित आहे. आज सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू झाल्यास दुपारनंतर पाणीपुरवठा केला जावू शकताे, असे अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले.
वाघूर राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशनचा गेल्या ४८ तासापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेला विद्युत पुरवठा शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरूळीत झालेला नव्हता. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे कुसुंबा नाल्याजवळील केबल जाेडणी रात्री उशिरापर्यंत सुरूच हाेती. त्यामुळे शनिवारचा शहरातील पाणीपुरवठा अनिश्चित आहे. शनिवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू झाल्यास दुपारनंतर पाणीपुरवठा केला जावू शकताे.
वाघूर राॅ-वाॅटर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता खंडीत झाला हाेता. गुरूवारी सायंकाळपर्यंत २२ किमी लांबीची विद्युत लाइन तपासणी केल्यानंतर कुसुंबा गावाजवळील नाल्यात अंडरग्राउंड केबलमध्ये तीन ठिकाणी खंड पडल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी सकाळपासून केबल जाेडणीचे काम सुरू हाेते; परंतु नाल्याला पावसामुळे पूर आल्याने सातत्याने कामात व्यत्यय येत हाेता. रात्री १२ वाजेपर्यंत दुरूस्ती पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे शनिवारी शहरातील पाणीपुरवठा अनिश्चित आहे. वीजपुरवठा सकाळपर्यंत सुरू झाल्यास शनिवारी दुपारी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे यांनी सांगितले.