पंख तुटलेल्या पाखराची गगन भरारी…… वर्ल्ड ट्रान्सप्लान्ट गेम्ससाठी जळगावच्या किशोरची निवड !

जळगाव लाईव्ह न्यूज : ४ एप्रिल २०२३ : वर्ष 2007, सततच्या डोकेदुखीमुळे दीर्घकाळ पेन किलर औषधी घेतल्याने किशोरच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. परिस्थिती अशी की चार पाऊले चालतांना देखील त्याला दम लागायचा. पण बहिण छायाने आपली एक किडनी देवून त्याला नवीन जीवनदान दिले आणि त्याने जणू या बोनस लाईफचे सोनेच केले. किडनी ट्रान्सप्लांट नंतर किशोर आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर नॉर्मल लाईफमध्ये पूर्ववत आला. एकेकाळी चार पावले चालतांनाही दमणाऱ्या किशोरने नंतर मात्र स्वतःला शारीरिकदृष्ट्या असे काही मजबूत बनविले की आता तो थेट ऑस्ट्रेलिया येथे १५ ते २१ एप्रिल दरम्यान होणाऱ्या ”वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स” मध्ये १०० मीटर रन आणि बैडमिंटन या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

ऑलिम्पिकच्याच धर्तीवर परंतु जगभरात अवयव दानाचा संदेश देण्यासाठी आयोजित होणाऱ्या ‘वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स’ मध्ये जगभरातील विविध देशातील अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींचा  समावेश असतो. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या क्रीडास्पर्धांमध्ये साधारणतः ३००० पेक्षा अधिक खेळाडू विविध खेळांमध्ये आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. बैडमिंटन, बास्केट बॉल, अथ्लेतीक्स गेम्स, गोळा फेक, स्विमिंग, फुटबॉल, रोड रेस, सायकलिंग, रिले रन यासारख्या अनेक खेळांचा या क्रीडास्पर्धेत समावेश असतो. यंदा ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या या क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय संघात एकूण ३० खेळाडूंची निवड झालेली असून त्यामध्ये महाराष्ट्रातून किशोर हा एकमेव खेळाडू आहे. सन २०१९ मध्ये देखील किशोरने इंग्लंड येथे झालेल्या या क्रीडास्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 

दररोज तीन तास सराव –

 १५ ते २१ एप्रिल दरम्यान होणाऱ्या ”वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स” साठी किशोरचा कसून सराव सुरु असून सकाळी साडे पाच ते साडे सात तो धावण्याचा सराव करीत असून संध्याकाळी सात ते आठ बैडमिंटन चा सराव करीत आहे. त्यासाठी तो आहाराकडे देखील विशेष लक्ष देवून आहे. 

राष्ट्रीय स्पर्धेत किशोरला ३ सुवर्ण १ रौप्य –

दर वर्षी मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण झालेल्यां व्यक्तींसाठी आयोजित  होणाऱ्या राष्ट्रीय ट्रान्सप्लांट गेम्स मध्ये किशोरला आजवर तीन वेळा सुवर्ण आणि एक रौप्य पदक प्राप्त झालेले आहे.

अवयव दान आणि किडनी रुग्णांसाठी कार्य –

नवीन लाभलेल्या आयुष्याप्रती आणि समाजाप्रती कृतज्ञता म्हणून किशोर? अवयव दान जनजागृतीसाठी कार्य करीत आहे. यासाठी त्याने आपल्या बहिणीच्या नावाने छाया किडनी फौंडेशनची स्थापना केलेली असून त्या माध्यमातून समाजामध्ये अवयव दानाविषयी आणि किडनी आजाराविषयी तो जनजागृती करीत असतो.   

आवडत्या क्षेत्रात काम –

किशोरला खेळासोबतच संगीत आणि लिखाणाची खूप आवड असून आजवर त्याने तीन पुस्तके लिहिली असून तो उत्तम गिटार वादक देखील आहे. त्याची ही आवड त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात घेऊन आली. तो रेडीओ डिव्हिजन एम मध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणून कार्यरत आहे.