जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । राज्यातील अनेक भागात मागच्या काही दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. याचबरोबर दिवसभर उन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस अशीच परिस्थीती बनली आहे. दरम्यान, पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे उद्या म्हणजेच बुधवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. Rain News Update In Maharashtra Today

दरम्यान, आज (ता. 06) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात जुलै महिना आणि ऑगस्टच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर मागील दोन ते तीन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली. यामुळे पाण्याअभावी पिकं माना टाकत होती. काही ठिकाणे पिकांचे पाते पिवळी पडायला लागली होती. अशात शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. मात्र तब्बल 15 दिवसांपेक्षा अधिकचा काल उलटूनही पाऊस पडत नसल्याचे चित्र होते. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार.
गुरुवारपासून पावसाचा जोर राज्यात वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे उद्या म्हणजेच बुधवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे.











