जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । राज्यातील सोलापूर जिल्ह्यात रेल्वे गाडीला अपघात झाला आहे. मालगाडीचे डबेही रेल्वे रुळावरुन घसरले असून मालगाडीचं इंजिन थेट शेतात घुसल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. करमाळा तालुक्यातील केम जवळ हा अपघात झाला आहे. यात सुदैवाने शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. आता ही रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम गावाजवळ सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसल्याचे पाहायला मिळालं. याबाबतचा व्हिडिओ TV9 वर प्रसिद्ध झाला आहे. आज सकाळच्या सुमारास केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले.

हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला, याचाही आता तपास केला जाईल. मात्र सध्या अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथकाकडून पुढील गोष्टी सुरळीत व्हाव्यात, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.












