जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । धावत्या रेल्वेत दोघा महिला प्रवाशांची मौल्यवान वस्तूंची बॅग चोरी करणा-या भुसावळच्या दोघा गुन्हेगारांसह चौघांना नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. चौघे आरोपी सध्या अकोला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहेत.
रईस शेख आणि मोहंमद समशेर शाह सलीम शाह दोघे रा. भुसावळ तसेच शाहरुख निसार खान (रा. सुरत गुजरात) आणि फिरोज अहमद फारुख अहमद शेख (रा.घाटकोपर मुंबई) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. जयमाला दिलीप डेकाटे (वय ५१) रा. नागपूर आणि माला राजेशकुमार गुप्ता (वय ५२) रा. नागपूर या दोन्ही महिला विदर्भ एक्सप्रेसने १४ऑगस्ट रोजी मुंबई ते नागपूर असा प्रवास करत होत्या. आपली बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या मुर्तीजापूर रेल्वे स्टेशन आल्यावर दोघींच्या लक्षात आले.
शोधाशोध केल्यानंतर त्यांना बॅग मिळाली मात्र बॅगमधील ऐवज गायब झालेला होता. जयमाला डेकाटे यांच्या बॅगमधून १४तोळे वजनाचे दागिने व मोबाइल तर माला गुप्ता यांच्या बॅगमधून व मोबाइल, सहा हजार रुपये रोख, कागदपत्र असा ऐवज गायब झालेला होता. एकुण 10 लाख 28 हजार 928 रुपयांचा ऐवज चोरी झाल्याप्रकरणी नागपूर रेल्वे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
लोहमार्ग नागपूरचे पोलिस अधीक्षक एम.राजकमार, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, लोहमार्ग नागपूर, प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरक्षक अर्चना गाढवे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप वानखडे, सतिश चव्हाण, उल्हास जाधव, कपील गवई, संजय वडगीरे, विजय शेगावकर आदींच्या पथकाने या तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रवाशाच्या नाकावर जखमेचा व्रण होता. त्यानेच चोरी केल्याची शक्यता बळावल्याने तपासाला गती देण्यात आली. मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे टोळीचा म्होरक्या भुसावळ येथील रईस शेख यास नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून त्याच्या तिन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्याकडून 7 लाख 81 हजार 328 रुपयांचे सोन्याचे दागिने, चार मोबाइल, रोख रक्कम, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 ऑग़स्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले आहेत.