राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची उघडीप, जळगावात पाऊस परिस्थिती कशी राहणार?

ऑगस्ट 24, 2022 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर ओसरला आहे. पुढील काही दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची उघडीप असणार आहे. मात्र, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज (ता. 24) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुढील दाेन दिवस पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

rain monsoon

मध्य भारतातील कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

सध्या राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. तसेच मुख्यतः पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली आहे. आज (ता. 24) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाच्या उघडीपीसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ होण्याचा अंदाज आहे.

जळगावात पुढील दाेन दिवस पाऊस मुक्कामी
दरम्यान, जळगाव शहरासह परिसरात मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरूच हाेती. पुढील दाेन दिवस पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी ३ वाजता डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेज ते नशिराबाद उड्डाणपुलापर्यंत जाेरदार पाऊस झाला. याचवेळी वाऱ्याचा वेगही अधिक असल्याने वाहनचालकांना वाहने रस्त्याच्या कडेला थांबवावी लागली. तरसाेदजवळ मात्र, पाऊस नव्हता हे विशेष.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now