जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिल्याने सूर्यदर्शन झाले. मात्र, अशात हवामान खात्याकडून भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील काही नद्यांना महापूर येऊ शकतो अशी देखील भीती हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे.

राज्यात जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी उन्हाचा पारा काही अंशाने वाढला होता. जळगावातही अवघ्या चार दिवसांत कमाल तापमान ४.४ अंशांनी वाढले आहे. मात्र अशात बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 ते 48 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान राज्यातील अनेक भागात जुलै आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चार महिन्यांच्या हंगामाला अजून दीड महिना बाकी असल्याने काही ठिकाणी हंगामी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.











