वन कर्मचार्‍यांवर हल्ला, १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ऑगस्ट 18, 2022 11:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । यावल तालुक्यातील डोंगरकठारा जवळील डोंगरदे वस्तीच्या पुढे असलेल्या पैझरीपाडा-काळाढोह येथे पसार आरोपींचा शोध घेण्यास गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. यात वनकर्मचारी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी यावल पोलिसात शासकीय कामात अडथळा, गैरकायद्याची मंडळी जमवत दहशत माजवणे सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

vanvibhag 1 jpg webp

पैझरीपाडा-काळाडोह वस्ती आहे. या भागातील कैलास बारेला याला अनधिकृतपणे वृक्ष तोड करतांना वनविभागाने पकडले होते व त्याचे साथीदार पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्याकरीता बुधवारी वनविभागाचे पथक जंगलात गेले होते. यात शासकीय वाहनाव्दारे वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक कृष्णा शेळके, रवींद्र तायडे, प्रकाश बारेला, गोवर्धन डोंगरे, जीवन नागरगोजे, सारंग आढाळे, महेश चव्हाण यांचे पथक पैझरी पाड्यावर पोहोचले त्या ठिकाणी असलेल्या एका छोट्याशा मंदिराच्या ओट्यावर काही संशयीत आरोपी झोपलेले दिसले तेव्हा त्यांना पकडले असता त्यांनी वनकर्मचार्‍यांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण करू लागले व आरडा-ओरड केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिला-पुरुषांचा जमाव लाठ्याकाट्या घेऊन त्या ठिकाणी आला.

त्याठिकाणी इना बारेला यांनी त्याच्या हातातील काठी घेऊन गोवर्धन डोंगरे यांच्या डोक्यात मारली तर रंगी पावरा यांनी कृष्णा शेळके यांना मारहाण केली या हाणामारीत कर्मचारी जखमी झाले तसेच या पथकावर जमावाने दगडफेक केली. स्वतःचा जीव वाचवून हे सर्वजण तेथून बाहेर निघाले व यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगलीचा प्रयत्न करणे, गैर कायद्याचा जमाव एकत्रीत करणे व वन अधिकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे या कलमान्वये रंगी पावरा, सुरेश पावरा, झामसिंग बारेला, बिलरसिंग बारेला, प्यारसिंग बारेला, सखाराम बारेला, इना बारेला, सीमा बारेला, रशीदा बारेला, मंजुराबाई बारेला, सावळीबाई बारेला, व्यापारीबाई बारेला या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now