जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर गेली अडीच वर्षांपासून बंद असलेली देवळाली भुसावळ पॅसेंजर (Devalali Bhusawal Passenger) अखेर रुळावर येणार आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून ११११३/१४ देवळाली भुसावळ पॅसेंजर सुरु होणार असल्याने सर्वसामान्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. मात्र ही गाडी पॅसेंजरएवजी मेल एक्सप्रेस असून भाडेही जास्त असेल .तसेच देवळालीहुन सुटणाऱ्या या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आल्याचे वेळापत्रकातून दिसून येत आहे. त्यामुळे जळगावला नोकरीनिमित्त येणाऱ्या चाळीसगावसह पाचोऱ्याच्या चाकरमान्यांची गैरसोय मात्र कायम राहणार आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये पॅसेंजरसह सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर कोरोना कमी झाल्याने टप्याटप्याने बहुतांश गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्याऐवजी मेमू गाड्या सुरु केल्या होत्या. परंतु देवळाली भुसावळ शटल अद्यापही बंदच होती. नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमाने पोटापाण्यासाठी दररोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी नाशिक देवळाली – भुसावळ शटलसह अन्य पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची आवश्यकता आहे. पॅसेंजर गाड्यांमुळे केवळ चकारमन्यांचीच प्रश्न सुटणार नसून सर्वसामान्यांच्याही प्रवासाची सोय होणार आहे.
अशातच आता देवळाली भुसावळ शटल येत्या १७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहेत. मात्र ही गाडी पॅसेंजरएवजी मेल एक्सप्रेस असून भाडेही जास्त असेल. गाडीला बारा डबे असून त्यातील दहा जनरलचे आणि दोन ब्रेक व्हॅन आहेत. परंतु चाकरमान्यांची गैरसोय कायम राहणार आहे. 11113 ही गाडी देवळाली येथून सकाळी ७.२० ला सुटेल त्यानंतर ते मनमाडला सकाळी ८. ३५ पोहोचेल, चाळीसगावला सकाळी ९. ४३ला, पाचोरा १०.२८ ला व जळगावला सकाळी ११.२७ तर भुसावळ येथे दुपारी १२. १५ ला पोहोचेल.
दरम्यान, गेल्या २ वर्षांपासून प्रवाशी संघटना, चाकरमानी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणी नुसार अखेर रेल्वे प्रशासनाने देवळाली भुसावळ पॅसेंजर एक्स्प्रेस स्वरूपात सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सर्व प्रवाशी संघटनांच्या मागणीचे हे यश असून उशिरा का होईना त्यांना न्याय मिळाला आहे. यासाठी मी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेबजी दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता व त्यांनीही सकारात्मकता दर्शवत संबंधितांना सूचना दिल्या होत्या. ना.रावसाहेबजी दानवे व रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार, असे आमदार मंगेश रमेश चव्हाण म्हणाले आहे.
या निर्णयाचे चाळीसगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत करतो मात्र गेली 2 वर्ष जळगाव येथे रोजगारासाठी सकाळी ४ वाजता उठून अप डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना देवळाली भुसावळ शटल च्या माध्यमातून शेवटची अपेक्षा होती मात्र रेल्वे प्रशासनाने जळगाव कडे जाण्याच्या वेळेत बदल केला असल्याने नियमित अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांनी यावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांना नवीन वेळेत धावणाऱ्या रेल्वेचा काहीही फायदा होणार नसून प्रवाशी – चाकरमानी यांच्या भावनांची दखल घेत प्रशासनाने सदर रेल्वे गाडी पूर्वीच्या वेळेतच सुरू करावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे.