जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । वरणगाव येथील महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्याने अनेक बसेस बायपास जातात. शाळा सुटण्याच्या नियोजनानुसार बस नसल्याने परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, तीन ते चार तास बस स्थानकावर थांबून रहावे लागते. त्यामुळे परिवहन विभागाने बससेवेचे योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे. वरणगाव शहराच्या आजूबाजूला २७ गावे आहेत. या गावांचे विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी वरणगावात येतात. येथील शाळेची वेळ दोन शिफ्ट मध्ये सकाळी सात ते बारा व दुपारी बारा ते पाच अशी आहे. विद्यार्थ्यांना येण्यासाठी अथवा जाण्यासाठी वेळेवर बस नसल्याने शाळेत येण्यासाठी उशीर होतो. तसेच शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास देखील उशीर होत असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बोहर्डी, काहुरखेडा, हतनूर, ऑर्डनन्स फॅक्टरी, तळवेल, पिंपळगाव, सावतर निंभोरा, कठोरा, या गावात जाण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे बोदवड रस्त्यावरील सुसरी, पिंपळगाव, आचेगाव, भानखेडा, करंजी, पाचदेवळी या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने वरणगावात शिक्षणासाठी येतात. परंतु बसमध्ये एकाच वेळी जास्त गर्दी होत असल्याने, काही विद्यार्थ्यांना बसमध्ये चढणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांना मागून येणाऱ्या दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागते. पर्यायाने हे विद्यार्थी शाळेत उशिरा पोहोचतात. राज्य परिवहन विभागाने लक्ष घालून विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. आगाराने याबाबत पाठपुरावा करावा.
पास सुविधा केंद्र बंद विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत पास दिल्या जातात. मात्र पास काढण्यासाठी भुसावळ येथील बस स्थानकावर जावे लागत होतेय यासाठी शासनाकडून वरणगाव येथे पास सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या काळामध्ये हे केंद्र बंद केले होते. आता पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी भुसावळ बसस्थानक गाठावे लागते.