जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । शहरासह जिल्ह्यात रेमेडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत असताना तरुणांची टोळी चक्क रेमेडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करत होती. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने टोळीतील एक धागा गवसला असता संपूर्ण साखळीच समोर आली आहे. दुपारी २ वाजेपासून आतापर्यंत तब्बल १० पेक्षा अधिक तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढतो आहे तसा रेमेडीसीवर आणि टोसीझुमब व इतर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला आहे. जळगावात अनेक जण इंजेक्शनचा काळाबाजार करीत असून बाजारात इंजेक्शन ७ हजार ते अडीच लाखापर्यंत विक्री केले जात आहे.
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना इंजेक्शनच्या काळाबाजारबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी काही जणांना ताब्यात घेतले. पथकाने चौकशी सुरू केली असता यामागे तरुणांची मोठी साखळीच असल्याचे समोर आले. दुपारपासून सायंकाळपर्यंत १० पेक्षा अधिक जणांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
तपासाअंती प्रत्येकाचा सहभाग लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, टोळीकडून अद्याप ४ रेमेडीसीवर इंजेक्शन हस्तगत करण्यात आले असून ते १५ ते ३० हजारांना विक्री केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.