दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्थेच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेस भारतातून बसले १४९२ विद्यार्थी.
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । दीपस्तंभ फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून २००५ पासून तरुणांच्या गुणवत्तापर्ण शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव व पुणे येथे दिव्यांग, अनाथ आणि वंचित (आर्थिक दृष्ट्या दुर्बल) ४०० विद्यार्थ्यांना निवासी आणि विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण उपलब्ध करुंन दिले जाते. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रकल्पात प्रवेशासाठी २४ जुलै रोजी भारतभरात राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती.
महाराष्ट्रात ऑफलाईन आणि महाराष्ट्राबाहेर ऑनलाईन पद्धतीने हि परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, अमरावती, जळगाव हि ६ परीक्षा केंद्र होती तर महाराष्ट्राबाहेर ऑनलाईन पद्धतीने हि परीक्षा घेण्यात आली. भारतातील २३ राज्यातून १४९२ विद्यार्थ्यांनी हि प्रवेश परीक्षा दिली असून यात ४५० दिव्यांग, ६० अनाथ आणि ९८२ वंचित घटकातील विद्यार्थी होते. यातून गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थी निवडून त्यांची मुलाखत घेऊन २५० विद्यार्थ्यांना या प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून १८ वर्षावरील निवड झालेल्या अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर , अनाथ, आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांना मनोबल प्रकल्पात निवासी, निशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण (UPSC,MPSC, SSC,IBPS, RRB ,MSW ,MBA, law etc Entrance ), उच्च शिक्षण ( BE, BCA, BBA, BA, B.Com, B.Sc, Phd etc ) तंत्रज्ञान प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.