⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

भुसावळामधील उपद्रव्यांवर पोलीस प्रशासन करणार कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । आगामी काळात सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी भुसावळ शहर, भुसावळ तालुका व भुसावळ बाजारपेठ हद्दीतील 32 उपद्रवींना शहरात येण्यापासून रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रस्ताव तयार करून ते भुसावळ प्रांताधिकार्‍यांकडे सादर केले आहेत.

तीनही पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी तयार केलेल्या प्रस्तावावर भुसावळ उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अंतिम कारवाई करून हे प्रस्ताव प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे गुरुवारी सादर केले आहेत. प्रांताधिकार्‍यांच्या निर्णयानंतर उपद्रवींना शहर बंदी केली जाणार आहे.


आगामी काळात रमजान, रामनवमी, हनुमान जयंती व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून सण-उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी उपद्रवींना शहराबाहेर ठेवण्याचे नियोजन असल्याचे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.

भुसावळ शहरातील शहरातील 16, बाजारपेठ हद्दीतील 11 व नशिराबाद हद्दीतील पाच उपद्रवींचे प्रस्ताव गुरुवारी प्रांताधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले असून या उपद्रवींना 9 ते 17 दरम्यान आठवडाभर शहरात येण्यास मनाई करावी, असे प्रस्तावात नमूद असल्याचे उपअधीक्षक म्हणाले. उत्सव कालावधीत ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत शिवाय यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता अशा उपद्रवींचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.